Rajapur Leopard Attack: खिणगिणीत बिबट्याचा धुमाकूळ; चार वर्षांच्या गायीची केली शिकार

परिसरात भीतीचे वातावरण; ३० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

राजापूर : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खिणगिणी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका चार वर्षांच्या गायीवर प्राणघातक हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खिणगिणी-कुणबीवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावातील जुन्या मंदिराच्या परिसरात घटना खिणगिणी-कुणबीवाडी येथील शेतकरी कृष्णा हरी डोंगरकर यांची गुरे दररोजप्रमाणे रानात चरण्यासाठी गेली होती. गावातील जुने नवलादेवी मंदिर आणि भातशीचे कुट परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कृष्णा डोंगरकर यांच्या चार वर्षांच्या गायीवर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात गाय जागीच ठार झाली.

पंचनाम्यात ३० हजारांचे नुकसान घटनेची माहिती मिळताच संबंधित शासकीय यंत्रणा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृत गायीचा पंचनामा केला. या हल्ल्यात शेतकरी कृष्णा डोंगरकर यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनामा करतेवेळी रवींद्र डोंगरकर, दत्ताराम डोंगरकर, माजी सरपंच विजय पाध्ये, पोलीसपाटील अशोक डोंगरकर, रमेश डोंगरकर तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतीकामे करणाऱ्या आणि गुरे राखणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरे चरण्यासाठी रानात सोडताना शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. बिबट्याच्या या वावरामुळे नागरिकांच्याही सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 24-08-2026