इंडिया गेट ते नवी दिल्ली पोलीस मुख्यालयादरम्यान शांततापूर्ण निदर्शने; सर्वोच्च न्यायालयात FIRची यादी सादर न केल्याने कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आगामी ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी नवी दिल्लीत भव्य आणि शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा CJP कडून करण्यात आली आहे.
२५ जुलैच्या आश्वासनांची पायमल्ली; ५ सप्टेंबरला मोर्चा
जंतरमंतरवरील बेमुदत आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी २५ जुलै रोजी सरकारने विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने या शब्दाचे पालन केले नाही. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी इंडिया गेट ते नवी दिल्ली पोलीस मुख्यालयादरम्यान मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व NEET पीडितांचे कुटुंबीय, पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक करणार आहेत. CJP नेते सौरभ दास आणि रत्ना सिंह यांनी देशभरातील विद्यार्थी आणि युवा संघटनांना यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतरही FIRची यादी देण्यास टाळाटाळ
CJP ने दावा केला आहे की, १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या सर्व FIRची यादी मागितली होती, जेणेकरून कलम १४२ अंतर्गत हे खटले मागे घेण्याबाबत विचार करता येईल. परंतु, सरकारने FIRची यादी देण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेले नाही. सरकार आपल्या आश्वासनांपासून माघार घेत असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे CJP ने म्हटले आहे.
‘शाळा दुरुस्त करा’ अभियानादरम्यान जयपूरमध्ये हिंसाचार
दुसरीकडे, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारी शाळांची दुरवस्था पाहून ‘शाळा दुरुस्त करो अभियान’ (स्कुल ठीक करो अभियान) सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत काम करत असताना राजस्थानमधील जयपूर जवळील रामपुरा-कंवरपुरा गावात CJP कार्यकर्त्यांवर हिंसाचार झाल्याची घटना घडली. यावर CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी राजस्थान सरकारने तातडीने या हिंसाचाराची दखल घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-08-2026














