संदीप देशपांडे यांचा भाजपवर घणाघात; स्पष्ट पुरावे असूनही एफआयआर का नाही? आंदोलन छेडल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार
MPSC कडून आयोजित औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या परीक्षेचा कागद फुटल्याचे स्पष्ट पुरावे समोर येऊनही पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप करत हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या प्रकरणी राज ठाकरे हे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
“शासनाकडून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न?” – संदीप देशपांडे यांचा सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. “सुमारे ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेच्या दोन दिवस आधीच पेपर फुटल्याचे उघड झाले असूनही आणि तपासात पुरावे मिळूनही पोलीस एफआयआर दाखल का करत नाहीत? शासन नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? भाजपचे कोणते चिल्ले-पिल्ले आणि बगलबच्चे यात सहभागी आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असा जाब देशपांडे यांनी विचारला.
“पेपरफुटी हा मूळ प्रश्न, जेन-झी सोबतच्या गप्पा निरर्थक”
विद्यार्थी किंवा नागरिकांनी आंदोलन केले की लगेच एफआयआर दाखल करणारे पोलीस आणि प्रशासन एवढा मोठा घोटाळा उघड होऊनही गुन्हा दाखल का करत नाहीत, असा सवाल देशपांडे यांनी केला. “रेशीम बागेत बसून तरुण पिढीसोबत (जेन-झी) गप्पा मारण्यापेक्षा आणि जुन्या आंदोलनांचे किस्से सांगण्यापेक्षा पेपरफुटीसारख्या ज्वलंत मूळ समस्येवर बोला,” असा टोला त्यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांना लगावला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा
न्यायाच्या अपेक्षेने आलेल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी दिलासा दिला असून, संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. “मराठी तरुणांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसे नेहमीच तत्पर आहे. राज ठाकरे याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. परंतु जर शासनाने योग्य निर्णय घेतला नाही आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले, तर मनसे संपूर्ण ताकदीने त्यांच्यामागे उभी राहील,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 25-08-2026














