Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; २४ तासांत ६० मिमी पावसाची नोंद तर ७०.९४ टक्के कोटा पूर्ण

रत्नागिरीत ऑगस्ट महिन्यात पावसाची विश्रांती

पाऊस बातमी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात केवळ ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या सकाळी आणि रात्रीच्या वेळी पावसाच्या सरी कोसळत असून दुपारी मात्र तीव्र ऊन पडत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या मोसमात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २ हजार ३८६ मिमी म्हणजेच ७०.९४ टक्के इतका पाऊस झाला आहे.

चालू वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यातही अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. तसेच नद्या व धरणांमधील पाणीपातळी प्रचंड खालावली होती.

जूनचा बॅकलॉक आणि धरमांतील पाणीसाठा

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. एकाच आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने जून महिन्याची तूट पूर्ण भरून निघाली आणि नदी-धरणांतील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली.

पाऊस बातमी रत्नागिरी: पिकांना संततधारेचा मोठा आधार

जुलै महिन्यातील धुवांधार पावसानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. महिना अखेरस आला तरी अद्याप मोठा मुसळधार पाऊस झालेला नाही. दररोज सरासरी २० ते ३० मिमी पावसाची नोंद होत आहे. मुसळधार पाऊस नसला तरी ऑगस्टमध्ये झालेल्या संततधारेमुळे शेतात उभ्या असलेल्या भात आणि नाचणीच्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे.

सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाची शक्यता

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरल्याने आता बळीराजाचे डोळे पुढील महिन्याकडे लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता सप्टेंबर महिन्यात परतीचा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:11 28-08-2026