Raksha Bandhan 2026: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रक्षाबंधनाचा उत्साह; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंपासून विविध नेत्यांनी साजरा केला सण

राजकारणातील भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा सुंदर क्षण; नेत्यांच्या घरी रंगला रक्षाबंधनाचा सोहळा

रक्षाबंधन २०२६ या पवित्र सणाचा उत्साह राज्यभरासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी हा सण उत्साहात साजरा केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधनाचा सण अतिशय आनंदात पार पडला. राज ठाकरे यांच्या बहिणी जयजयवंती ठाकरे यांनी त्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते आणि त्यांनी रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला.

दुसऱ्या बाजूला, दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. तसेच, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली व रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या घरीही रक्षाबंधनाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. त्यांची बहीण वैशालीताई यांनी आशिष शेलार यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा घट्ट केला.

याशिवाय विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांनीही विविध ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले, ज्या माध्यमातून नात्यातील आपुलकी आणि जिव्हाळा अनुभवायला मिळाला. त्याचप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करत शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 28-08-2026