जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन; रुग्णांची होणारी गैरसोय तात्काळ थांबवण्याची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेले औषध निर्माणशास्त्र (फार्मासिस्ट) हे पद तात्काळ भरावे तसेच कागदोपत्री येथे हजेरी असलेल्या सफाई कामगारास प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी पंचायत समिती सदस्य श्री. संयोग (दादा) संजीव दळी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना (DHO) लेखी निवेदन सादर केले आहे.
सफाई कामगार जिल्हा कार्यालयात; प्राथमिक केंद्रात गैरसोय
चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळपास एका वर्षापूर्वी श्रीमती कोमल पवार या सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र, त्या प्रत्यक्ष चांदेराई आरोग्य केंद्रात सेवा न देता केवळ तेथील हजेरी मस्टरवर असून जिल्हा कार्यालयात सेवा बजावत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- रुग्णसेवेवर ताण: सद्यस्थितीत चांदेराई केंद्रात केवळ एकच सफाई कामगार कार्यरत आहे.
- ओपीडी व शस्त्रक्रियांची संख्या मोठी: या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २०० हून अधिक बाह्यरुग्ण (O.P.D.) तपासणीसाठी येतात. याशिवाय नियमित प्रसुती, कुटुंब नियोजनाच्या केसेस तसेच छोटी-मोठी ऑपरेशन्स येथे पार पडतात.
- अशा वेळी कायमस्वरूपी पूर्णवेळ सफाई कामगार उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असल्याने श्रीमती कोमल पवार यांना चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात मूळ नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
एका वर्षापासून ‘फार्मासिस्ट’चे पद रिक्त
गेल्या सुमारे एका वर्षापासून चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माणशास्त्र (फार्मासिस्ट) हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे.
फार्मासिस्ट नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर लिहून दिलेली औषधे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांना द्यावी लागत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासनाने हे पद प्राधान्याने भरून चांदेराई आरोग्य केंद्रात तात्काळ फार्मासिस्टची नियुक्ती करावी, असे आवाहन संयोग दळी यांनी निवेदनाद्वारे केले आहे.














