Ratnagiri Gram Panchayat Officer Union: रत्नागिरीत उद्या ग्रामपंचायत अधिकारी युनियनचा भव्य मूक मोर्चा

पी. एन. पाटील हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

रत्नागिरी: Ratnagiri Gram Panchayat Officer Union च्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या विविध प्रमुख मागण्यांसाठी उद्या, मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे शासकीय कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतील दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा व्हावी, ही या मूक मोर्चाची मुख्य मागणी आहे.

याशिवाय, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करून वर्षातून १० ते १२ ग्रामसभांऐवजी केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा ठेवण्याची कायदेशीर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी युनियनने केली आहे. ग्रामसभेत बाहेरील व्यक्तींकडून सोशल मीडियासाठी केल्या जाणाऱ्या अनाधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंगवर कायदेशीर बंदी घालणे, संवेदनशील आणि मोठ्या ग्रामपंचायतींच्या बैठकांना प्रशासनाकडून मोफत पोलीस बंदोबस्त पुरवणे, तसेच कृषी, आरोग्य व समाजकल्याण विभागांच्या योजनांची जबाबदारी संबंधित विभागांवरच सोपवणे या इतर प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याऐवजी तालुका किंवा पंचायत समिती स्तरावर निश्चित करावेत, असा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व न्याय्य हक्कांसाठी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या मूक मोर्चामध्ये सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र महाडीक व जिल्हा सरचिटणीस संजय दळवी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 31-08-2026