९ गुणवंत शिक्षकांची होणार निवड; शासनाच्या मंजुरीनंतर अधिकृत नावे जाहीर होणार
रत्नागिरी: Ratnagiri Adarsh Shikshak Puraskar अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ निवड प्रक्रियेने आता अंतिम टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या मुलाखतीची प्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. या मुलाखती दरम्यान तब्बल २६ प्राथमिक शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांचा लेखाजोखा निवड समितीसमोर प्रभावीपणे मांडला. राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच पुरस्कारप्राप्त ९ आदर्श शिक्षकांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहेत.
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण २७ प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्तावांपैकी २६ शिक्षक प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. मुलाखतीदरम्यान शिक्षकांनी अध्यापनात राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा केलेला प्रभावी वापर तसेच शाळा व समाजाच्या सर्वांगीण विकासातील योगदान याबाबत सविस्तर सादरीकरण केले. निवड समितीने प्रत्येक शिक्षकाच्या प्रत्यक्ष कामाची कसून पाहणी करत सखोल मूल्यमापन केले.
या महत्त्वपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेवेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, सुयोग कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा कदम आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलाखतींच्या अत्यंत पारदर्शक मूल्यांकनानंतर प्राप्त गुणांच्या आधारे जिल्ह्यातील गुणवंत ९ शिक्षकांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. शासनाकडून हिरवा कंदील मिळताच या ९ आदर्श शिक्षकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 31-08-2026














