हार्दिक जोशी, अक्षया देवधर, ईशा केसकर, पूजा सावंत आणि गिरिजा प्रभू यांची विशेष हजेरी; महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आयोजित महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार असल्याने रत्नागिरीतील महिला वर्गामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि स्थानिक नेतृत्व
हा भव्य सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जात आहे. तसेच भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मनोरंजक उपक्रम पार पडणार आहेत.
मराठी मालिकाविश्वातील तारांगण आणि शासकीय योजनांचे मार्गदर्शन
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी चित्रपट व मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (राणादा), अक्षया देवधर (मास्तरीणबाई), अभिनेत्री ईशा केसकर, पूजा सावंत आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ फेम गिरिजा प्रभू विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिलांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. रत्नागिरीतील सर्व माता-भगिनींनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वर्षाताई ढेकणे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
19:01 31-08-2026














