शहर, ग्रामीण व जयगड पोलिसांची धडक कारवाई; शहर व महामार्गावरील बेशिस्त पार्किंगविरुद्ध कठोर भूमिका
रत्नागिरी: Ratnagiri Traffic Violation Action च्या भाग म्हणून सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने मोटार, रिक्षा व दुचाकी पार्क करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील जयस्तंभ, रहाटाघर, आठवडा बाजार, रेल्वेस्टेशन फाटा, कारवांचीवाडी फाटा, खेडशी, तसेच जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा ते मिरवणे, सह्याद्रीनगर परिसर आणि मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आठ वाहनचालकांविरुद्ध शहर, ग्रामीण व जयगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवार (ता. २८) आणि शनिवार (ता. २९) या दोन दिवसांत सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने उभी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित वाहनचालकांनी आपल्या ताब्यातील रिक्षा, मोटार व दुचाकी अशा प्रकारे पार्क केल्या होत्या की, ज्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता.
या प्रकरणी महेश अजित भानुशाली (वय ४७, रा. शिवाजीनगर), कल्पेश अरुण राणे (वय ३६, रा. मिरजोळे), योगेश यशवंत शेलार (वय ३४, रा. नेवरे उंबरवाडी), विनोद अशोक शिर्के (वय ४९, रा. करबुडे), संजीवकुमार सुभाषे डोंगरे (वय ३८, रा. खेडशी), ओकार अशोक पंडित (वय ३१, रा. चाफेरी), जहीर सलीम मापारी (वय ४०, रा. कोडअसुर्डे, ता. संगमेश्वर) आणि अनिल जगन्नाथ कावेकर (वय ६१, रा. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौक व फाट्यांवर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. या संवेदनशील ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुप पाटील, आशिष भालेकर, ईशीता वाडावे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल चव्हाण, महिला पोलीस हवालदार सानिया कांबळे, संकेत आटोळे, सचिन पवार, दिपाली काळे आणि दिनेश हरचकर यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील; त्यामुळे नागरिकांनी अधिकृत पार्किंगचाच वापर करावा, असे स्पष्ट आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 31-08-2026














