गोकुळाष्टमीच्या उत्साहात रत्नागिरीत शरीरसौष्ठवाचा जल्लोष; आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन
गोकुळाष्टमीच्या मंगलमय पर्वानिमित्त राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘राधाकृष्ण श्री – २०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा उद्घाटन समारंभ रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ, रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
१५ वर्षांची परंपरा आणि वैश्य युवा संस्थेचा पुढाकार
राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरीच्या वतीने गेल्या १०० वर्षांपासून गोकुळाष्टमीनिमित्त विविध सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या परंपरेतील जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने करण्यात येत असून, गेल्या ५ वर्षांपासून वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या पुढाकाराने या स्पर्धेला अत्यंत भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशन’च्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Radhakrishna Shree Bodybuilding Competition Ratnagiri चे प्रमुख आकर्षण: मेन्स फिजिक्सचा समावेश
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन शेठ मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र शेठ वणजू, सेक्रेटरी बाबू शेठ खातू, नगरसेवक केतन शेट्ये, नगरसेवक सौरभ मलुष्टे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश दळी, रत्नागिरी पंचायत समिती सदस्य दादा शेठ दळी, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, नरेंद्र शेठ वणजू यांसह मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच ‘मेन्स फिजिक्स’ या नवीन क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
19:01 31-08-2026














