पोलीस ठाणे आणि माहेर वृद्धाश्रमात फिरवली आपुलकीची राखी
रत्नागिरी: Ratnagiri Photographer Association Rakshabandhan उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी आणि आपलेपणाची भावना जोपासत रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने यंदाचे रक्षाबंधन अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारी पोलीस यंत्रणा आणि आधाराची गरज असलेल्या वृद्धाश्रमातील बांधव यांच्यासोबत हा सण साजरा करत असोसिएशनने समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
पोलीस बांधवांना राखी बांधून व्यक्त केल्या सदिच्छा
या उपक्रमांतर्गत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट दिली. दिवस-रात्र कडक उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांना असोसिएशनच्या महिला सदस्यांनी राखी बांधली आणि त्यांच्या सुरक्षिततेसह दीर्घआयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी वाहतूक पोलीस शाखेचे उपनिरीक्षक संजय कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भार्गव घाग, पोलीस हवालदार सुशांत पवार, राजेश देवरुखकर, किशोर वाघाटे, निलेश कांबळे, तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत, हवालदार बाळू पालकर, रणजीत जाधव, राहुल पावसकर, शरद कांबळे, प्रतीक कांबळे यांसह पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहेर वृद्धाश्रमात भावुक वातावरण; वृद्धांचे तोंड गोड
कार्यक्रमाचा दुसरा भावुक टप्पा ‘माहेर वृद्धाश्रम’, रत्नागिरी येथे पार पडला. वृद्धाश्रमातील अनाथ वृद्ध बांधवांना राखी बांधून आणि त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधून असोसिएशनच्या सदस्यांनी भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट केली. या प्रसंगी वृद्ध बांधवांचे तोंड गोड करून सर्वांनी एकत्र अल्पोपहार केला. आपल्या पाठीशी हक्काची माणसे उभी असल्याची भावना मिळाल्याने वृद्धाश्रमातील वातावरण भावुक झाले होते.
असोसिएशनच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक
कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण टिपणारे छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर खऱ्या अर्थाने समाजातही आनंदाचे व आपलेपणाचे रंग भरत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष गुरु चौगुले, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, मंथन माalgुंडकर, पदाधिकारी संदेश पवार, सचिन शिंदे, अजीम वस्ता यांसह इतर पदाधिकारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 29-08-2026














