रत्नागिरी जिल्ह्यात बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची मोठी कारवाई: एकाच दिवशी २४ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

भारतीय न्यायसंहिता कलम २८५ अंतर्गत जिल्हाभरात धडक मोहीम; वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. २७ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८५ अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी ग्रामीण, लांजा आणि खेडमध्ये अनेक वाहनांवर कारवाई

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर रस्ता अडवून वाहने उभी केल्याप्रकरणी विजय यशवंत पवार, विजय यशवंत रेवाळे, सचिन प्रदीप साळुंखे आणि रंजीत रघुनाथ लवंदे यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील एसटी स्टँड परिसर, जावडे फाटा आणि सोनाई हॉस्पिटलसमोर अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी गौरव हेमंत आग्रे, कल्पेश अरुण राणे, अल्ताफ मुराद ठाकुर, निखिल अनंत लिंगायत आणि योगेश किशोर पांचाळ यांच्यावर पोलीस कारवाई झाली. खेड शहरात नगर परिषदेसमोरील खेड-दापोली मार्गावर दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी उभी केल्याप्रकरणी क्षितीज संजय दरेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

महामार्ग व बाजारपेठांमधील बेशिस्त वाहनांना पोलिसांचा दणका

अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळी बुद्रुक येथील गुहागर-विजापूर राज्य महामार्गावर अवजड वाहने उभी करून रस्ता अडवल्याप्रकरणी कर्नाटकातील सरदार लालू चव्हाण आणि अमेश लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले. चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे टाटा मॅजिक वाहन उभे केल्याप्रकरणी संतोष परशुराम शिंदे याच्यावर, तर संगमेश्वर बाजारपेठ व देवरूख मार्गावर धोकादायक स्थितीत वाहने पार्क केल्याप्रकरणी निलेश नामदेव चव्हाण, अय्य सरदार कतनळी आणि कोल्हापूरचे दिनेश मधुकर कांचले यांच्यावर कारवाई झाली. राजापूरमध्ये सोल्ये ते रेल्वे स्थानक नो-पार्किंग झोनमध्ये ईको वाहन उभे केल्याप्रकरणी ईस्माईल जाफर नाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रत्नागिरी शहरासह जयगड सागरी पोलिसांकडूनही गुन्हे नोंद

रत्नागिरी शहरातील तेलीआळी नाका, आठवडा बाजार, जेलनाका, जयस्तंभ, नगर वाचनालय आणि मारुती मंदिर परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या अरविंद केशव शिंदे, आदिल इकबाल बहुये, अक्षय मोहन राऊत, रविकांत देवानंद कडपट्टे आणि सागर सुभाष बंदरकर यांच्याविरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली. तसेच जयगड रोडवरील खंडाळा येथे बोलेरो वाहन धोकादायक स्थितीत सोडल्याप्रकरणी कोल्हापूरचे मानाजी सदाशिव चव्हाण यांच्यावर जयगड सागरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने ही धडक कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 31-08-2026