भात व नाचणी पिकांना फटका; तीन महिन्यांत अवघा २,४३८ मि.मी. पाऊस नोंदवला
रत्नागिरी: Ratnagiri Rainfall Deficit च्या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक हजेरी लावल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने मारलेल्या दीर्घ दडीमुळे चिंतेचे ढग दाटले आहेत. यंदा पावसाने अपेक्षित सरासरी न गाठल्यामुळे ऑगस्टअखेर सरासरीच्या तुलनेत तब्बल २७.५० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
जून ते ऑगस्टअखेर जिल्ह्यात सरासरी २ हजार ४३८.९९ मि.मी. इतका पाऊस झाला असून, गतवर्षी याच कालावधीत ३ हजार २१७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ७७८.४८ मि.मी. म्हणजेच २४.२० टक्क्यांनी घट झाली आहे. कोकणात दरवर्षी सरासरी ३ हजार ३६४.२२ मि.मी. पाऊस पडतो; मात्र यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७२.५० टक्केच पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात संथगतीने सुरू झालेला पाऊस जुलैमध्ये दमदार बरसला. परंतु, ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे निराशा केल्यामुळे भात आणि नाचणी पिकांना मोठा फटका बसण्याची आणि पिकांवर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये):
- मंडणगड: २,६४० मिमी
- दापोली: २,६७१ मिमी
- खेड: ३,०६३ मिमी
- गुहागर: २,११७ मिमी
- चिपळूण: २,९५७ मिमी
- संगमेश्वर: २,६७१ मिमी
- रत्नागिरी: १,८४८ मिमी
- लांजा: २,२७२ मिमी
- राजापूर: २,१६० मिमी
- एकूण सरासरी: २,४२०.१८ मिमी
तसेच, कोकणात सर्वसाधारणपणे पाऊस अधिक असला तरी शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ टक्के तूट नोंदवली गेली आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत २ सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४४ टक्के पावसाची तूट असून त्यापाठोपाठ हिंगोली (४३%), बीड (४२%), अमरावती (३८%), नंदुरबार (३६%), अकोला (३५%) आणि जालना (३५%) या १५ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी घट झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 31-08-2026














