ग्रामस्थांना पाणी घेण्यास मज्जाव; महसूल नोंदीत सरकारी विहीर असल्याचा दावा
खेड : खेड तालुक्यातील आंबये गावात गेल्या दीडशे वर्षांपासून सर्व ग्रामस्थांच्या वापरात असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून मालकी हक्काचा वाद निर्माण झाला आहे. एका ग्रामस्थाकडून या विहिरीवर वैयक्तिक मालकी हक्क सांगून ग्रामस्थांना पाणी घेण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप रविवारी (३० ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकपाळवाडी आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक पाणवठ्याचा हा प्रश्न तालुका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी तातडीने सोडवावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दीडशे वर्षांपासूनचा पाणवठा अन् वैयक्तिक मालकीचा दावा
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आंबये गावातील संबंधित विहीर सुमारे दीडशे वर्षांपासून सार्वजनिक वापरात आहे. सकपाळवाडी, सुतारवाडी तसेच आजूबाजूच्या वाड्यांमधील अनेक कुटुंबे आपल्या दैनंदिन पाण्यासाठी या विहिरीवर अवलंबून आहेत. या परिसरात वयोवृद्ध, आजारी आणि दिव्यांग नागरिकांची संख्या मोठी असल्याने पाण्यासाठी अन्य पर्याय शोधणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. दरम्यान, हनुमंत सकपाळ यांनी या विहिरीवर स्वतःचा मालकी हक्क असल्याचा दावा करत विहिरीवर आपल्या वडिलांच्या नावाची पाटी लावल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे सार्वजनिक वापरातील विहिरीवरून गावात मोठा वाद निर्माण झाला आहे.
महसूल नोंदीत ‘सरकारी विहीर’ असल्याचा दावा; प्रशासनाकडे धाव
सदर विहिरीबाबत महसूल विभागाच्या १४ नंबरच्या पाणीपुरवठा साधनांच्या नोंदवहीत विहीर ‘सरकारी’ असल्याची नोंद असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. एका बाजूला सरकारी नोंदीत विहीर सार्वजनिक अथवा सरकारी असल्याचे नमूद असताना दुसऱ्या बाजूला वैयक्तिक मालकी हक्क दाखवला जात असल्याने या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वादामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 01-09-2026














