Ravindra Surve Murder Case Ratnagiri: रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा झटका; गुन्ह्याचे गांभीर्य व प्रत्यक्षदर्शींचे पुरावे ठरले महत्त्वाचे

रत्नागिरी:– अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा झटका दिला आहे. गुन्ह्याचे अत्यंत गंभीर स्वरूप, प्राणघातक शस्त्राचा झालेला वापर आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे सबळ पुरावे विचारात घेत उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे.

मोबाईलच्या वादातून तलवारीने वार

२४ ऑगस्ट २०२३ रोजी रवींद्र सुर्वे यांचा त्यांच्याच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान २५ ऑगस्ट २०२३ च्या पुरवणी जबाबात धक्कादायक माहिती उघड झाली. घटनेच्या रात्री आरोपी संजय सुर्वे, दुसरा आरोपी वसंत हिलाम आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मंगेश मोहिते हे संजय सुर्वे याच्या खोलीत मद्यप्राशन करत होते. दरम्यान, मोबाईल फोनच्या कारणावरून झालेल्या तीव्र वादातून संजय सुर्वे याने तलवारीने रवींद्र सुर्वे यांच्या डोक्यावर, कमरेवर आणि हातावर प्राणघातक वार केले, तर सह-आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण केली. या घटनेनंतर २५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांनी आरोपी संजय सुर्वे याला अटक केली होती.

सरकारी वकिलांचा जामीनाला तीव्र विरोध

चिपळूण सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या पोलीस जबाबात आणि दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात विरोधाभास असल्याचा आणि तपासात त्रुटी असल्याचा दावा आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. याउलट, सरकारी वकिलांनी जामीनाला तीव्र विरोध दर्शवत न्यायालयात मांडले की, मृताचा मृतदेह आरोपीच्याच जागेत सापडला असून तलवारीने शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर भीषण वार करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 01-09-2026