Guhagar: मार्गताम्हाणे एमआयडीसी डॉ. विनय नातू यांच्यामुळेच रद्द; गुहागर युवासेनेचा गंभीर आरोप

माजी आमदार नातू यांनी तरुणांचा रोजगार हिरावला; पत्रकार परिषदेत व्हिडिओ पुरावा दाखवत साधला निशाणा

गुहागर:

मार्गताम्हाणे येथील एमआयडीसी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यामुळेच रद्द झाली असून, याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत, असा गंभीर आरोप गुहागर युवा सेना शहराध्यक्ष राज विखारे यांनी केला आहे. गुहागर येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी २०२४ मधील निवडणूक प्रचारादरम्यान शृंगारतळी येथील सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सादर केला. ‘जर डॉ. नातू सांगत असतील तर एमआयडीसी रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले’, असे विधान पालकमंत्र्यांनी जाहीर सभेत केले होते, असा दावा विखारे यांनी व्हिडिओ दाखवून केला. एमआयडीसी रद्द करून डॉ. नातू यांनी स्थानिक तरुणांचा रोजगार हिरावून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

भाजपचे जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विखारे म्हणाले की, आमदार भास्कर जाधव गुहागरमधून चार वेळा निवडून आले आहेत. ते कधीही कोणाचा धसका घेत नाहीत, उलट दुसऱ्यांना धसका घ्यायला लावतात. त्यामुळेच अनेकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा पलटवार त्यांनी केला. भाजप नेत्याने गुहागरमध्ये येऊन आमदार जाधव यांच्यावर केलेली चिखलफेक युवा सेना विसरलेली नाही; यापुढे आमच्यावर टीका टिप्पणी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अवैध धंद्यांवर कारवाईचे आव्हान अन् ‘निरामय’वरून टोला

आमदार जाधव शृंगारतळीतील एका भाजप कार्यकर्त्यावर बोलले हे भाजपला झोंबले आहे. ज्यांचे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर खुशाल कारवाई करा, सरकार तुमचेच आहे, मग कारवाई करायला घाबरता का? असा सवाल विखारे यांनी केला. याशिवाय निरामय रुग्णालय सुरू करण्याबाबत माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरमध्ये येऊन घोषणा केली होती; मात्र दोन वर्षांनंतरही हे रुग्णालय सुरू झाले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:15 01-09-2026