संगमेश्वरात बेकायदेशीर वाहन पार्किंग; ३ दिवसांत ६ चालकांवर गुन्हे दाखल

सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस आणि पादचाऱ्यांना होतोय अडथळा; संगमेश्वर पोलिसांची धडक कारवाई

संगमेश्वर:

संगमेश्वर बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्यात आली आहे. २७ ते २९ ऑगस्टदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या एकूण ६ वाहनचालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

२७ ऑगस्टला ३ वाहनचालकांवर कारवाई

२७ ऑगस्ट रोजी रात्री सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पहिली कारवाई बाजारपेठेतील राज ट्रेडर्स दुकानासमोर झाली; जिथे नीलेश नामदेव चव्हाण (वय ४०, रा. कोळंबे चव्हाणवाडी) याने टाटा जिप टेम्पो (क्र. MH 08 W 4945) धोकादायक स्थितीत उभा केला होता. दुसरी घटना देवरुख रस्त्यावरील साईनाथ कोल्ड्रिंक्ससमोर घडली. तिथे दिनेश मधुकर कांबळे (३४, रा. शाहूवाडी, कोल्हापूर) याने बोलेरो पिकअप (क्र. MH 09 FL 4312) वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने पार्क केली होती. तिसरी कारवाई याच मार्गावरील नवनाथ कोल्ड्रिंक्ससमोर हुंडाई औरा कार (क्र. MH 08 BB 3711) उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अयुब सरदार कतनळी (५०, रा. संगमेश्वर) याच्यावर झाली.

२८ आणि २९ ऑगस्टच्या कारवाया

२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.२३ वाजता देवरुख रस्त्यावर एसटी स्टँडच्या समोर मारुती अल्टो गाडी (क्र. MH 06 W 2421) धोकादायक स्थितीत उभी केल्याप्रकरणी अमित श्रीपाद सावंत (४५, रा. माभळे पुनर्वसन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाजारपेठेत गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदारांनी दोन रिक्षाचालकांवर कारवाई केली. यामध्ये संतोष धर्मा जाधव (४६, रा. माभळे) याने आपली रिक्षा (क्र. MH 08 AQ 5729) आणि जहीर सलीम मापारी (४०, रा. कोडसुरडे) याने आपली रिक्षा (क्र. MH 08 AQ 5402) सार्वजनिक रस्त्यात उभी करून प्रवाशांना व वाहनांना धोका निर्माण केल्याने दोघांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

रस्त्यावर बेकायदेशीरपणे आणि अस्ताव्यस्त वाहने उभी करून पादचारी व इतर वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 01-09-2026