मनोज जरांगे यांच्या उपोषणाला महायुती सरकारच जबाबदार; मुंबई कूचच्या हाकेवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया
रत्नागिरी:- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण कधीही देणार नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना पुढे करून ते शब्द द्यायला लावतात आणि नंतर तो शब्द पाळत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे मराठाद्वेष्टे आहेत,” अशी जोरदार टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. महायुती सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही, ही वस्तुस्थिती असल्याचेही ते म्हणाले.
ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना येथील आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला.
‘सरकारवर जरांगे पाटलांचा विश्वास उरलेला नाही’
भास्कर जाधव पुढे म्हणाले की, “सरकारमधील कुठल्याच नेत्यावर आता जरांगे पाटील यांचा विश्वास राहिलेला नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला थेट महायुती सरकारच जबाबदार आहे. प्रत्येक वेळी नवीन जीआर (GR) काढून जरांगे पाटलांचे उपोषण सोडवायचे आणि नंतर त्यांचा विश्वासघात करायचा, या सगळ्या प्रकारामुळे जरांगे पाटील उद्विग्न झाले आहेत. मी स्वतः लवकरच जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.” तसेच सध्या राज्यात ‘हम करे सो कायदा’ असा कारभार सुरू असून मुख्यमंत्र्यांची सर्व क्षेत्रात दादागिरी चालल्याचा आरोपही त्यांनी केला.
मराठी भाषा अन् भाजपच्या धोरणावर निशाणा
मराठी भाषेच्या सक्तीबाबत बोलताना जाधव म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला मराठी भाषेचा किती तिरस्कार आहे, हे त्यांच्या भूमिकांवरून स्पष्ट होते. भाजपला आता आपले मित्रपक्ष ओझे वाटू लागले असून त्यांना मित्रांची साथ नको, तर केवळ सत्ता हवी आहे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 01-09-2026














