Supreme Court CJP March Order: ५ सप्टेंबरच्या ‘CJP’ मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; १० सप्टेंबरला पुढील सुनावणी

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा रोखण्याची मागणी; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाचे महत्त्वपूर्ण आदेश

नवी दिल्ली:- कॉकरोच जनता पार्टीचा (CJP) ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणारा प्रस्तावित ‘युवा मोर्चा’ थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. आगामी १२ आणि १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा परिषद संपेपर्यंत स्थगित करण्याची मागणी एका याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सध्या हस्तक्षेपास नकार देत या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे प्रशासनाचे काम

या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. “सध्याच्या स्थितीत कोणतीही अनुचित घटना घडेल असे मानण्यास कोणतेही सबळ कारण नाही. प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याची आणि सर्व राजकीय व सामाजिक पक्ष शांततेने, जबाबदारीने व कायद्यानुसार वागतील याची खात्री करण्याची पूर्ण अपेक्षा आहे,” असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

संभाव्य अनुचित घटनेच्या भीतीने एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या वतीने अॅड. सय्यद रिझवान यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याला आपली बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्याचे आणि याचिकेची प्रत सॉलिसिटर जनरल यांना देण्याचे निर्देश दिले असून, यावर १० सप्टेंबर रोजी मुख्य खटल्यासोबत सुनावणी होणार आहे.

CJP मोर्चा का काढत आहे?

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने (CJP) केंद्र सरकारवर २५ जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासने मोडीत काढल्याचा गंभीर आरोप केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी आणि आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर (FIR) मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यास सतत विलंब केला जात आहे.

याच निषेधार्थ CJP राष्ट्रीय कार्यकारिणीने शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत भव्य शांततापूर्ण ‘युवा मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:48 01-09-2026