राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत तायक्वांदो खेळाडूंचा गौरव; ब्लॅक बेल्ट प्राप्त खेळाडूंना दक्षिण कोरियाची प्रमाणपत्रे प्रदान

‘युवा मार्शल आर्ट तायक्वांदो सेंटर’ आणि ‘मेरा युवा भारत’चा संयुक्त उपक्रम; राष्ट्रीय विजेत्यांचाही सन्मान

रत्नागिरी:– ‘युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर’ आणि भारत सरकारच्या ‘मेरा युवा भारत, रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोडाऊन स्टॉप येथील साई सेवा मित्रमंडळात आयोजित या कार्यक्रमाला ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष सावंत, सोनाली सावंत, मधुर धुळप व पांडुरंग आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रीडा दिनाचे महत्त्व अन् राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

कार्यक्रमादरम्यान खेळाडू नुपूर दप्तरदार आणि सई सुवरे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांना राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी तेलंगणा (हैदराबाद) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मयूरी कदम, रूही कररा, गुरुप्रसाद सावंत आणि उपर्जना राम कररा या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

Tata nexon

दक्षिण कोरियाची अधिकृत ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्रे वाटप

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन’ परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना थेट दक्षिण कोरियातून प्राप्त झालेली अधिकृत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये मंथन आंबेकर, युसुफ मोगल, सिद्धी धुळप, स्वरा तेरवणकर आणि रूद्रा सुर्वे या गुणवंत खेळाडूंचा समावेश होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख प्रशिक्षक राम कररा यांनी सूत्रसंचालन केले, तर शशीरेखा कररा, गुरुप्रसाद सावंत, अमेय पाटील व सई सुवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 01-09-2026