Konkan Divisional Commissioner Chiplun Visit: “मलाही लहानपणी शिक्षिकाच व्हायचं होतं”; चिपळूण दौऱ्यात रुबल अगरवाल यांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी

कोंडमळा आदर्श शाळेत विद्यार्थिनींशी साधला आत्मीय संवाद; चिपळूण उपविभागाच्या पूरनियंत्रण व प्रशासकीय कामांचे केले कौतुक

चिपळूण, रत्नागिरी: प्रशासकीय कार्यक्षमता, विकासकामांची थेट पाहणी आणि शाळकरी चिमुरड्यांशी साधलेला आत्मीय संवाद अशा एका संवेदनशील व प्रेरक शैलीत कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांचा चिपळूण दौरा पार पडला. “मलाही लहानपणी शिक्षिकाच व्हायचं होतं,” अशी भावना व्यक्त करत आयुक्तांनी बालपणीच्या आठवणींना हळूवार उजाळा दिला.

कोंडमळा (ता. चिपळूण) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्र. १ मधील मतदान केंद्रांची पाहणी करताना एका प्रशासकीय अधिकाऱ्यातील संवेदनशील रूप पाहायला मिळाले. शाळेतील मुलींशी गप्पा मारताना, “मोठं होऊन काय व्हायचंय?” असा सहज प्रश्न आयुक्तांनी विचारला. त्यावर मुलींनी डॉक्टर, गायिका, शिक्षिका अशी उत्स्फूर्त स्वप्ने मांडली. या निरागस उत्तरांनंतर अगरवाल यांनी स्वतःचे बालपणीचे स्वप्न सांगितले. पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छतागृहांची माहिती घेतली व उत्कृष्ट काम करणाऱ्या बीएलओ एस. एस. मालगुंडकर आणि के. एस. खापरे यांचे कौतुक केले.

चिपळूण उपविभागाच्या कामगिरीचा गौरव उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पूरनियंत्रण, पर्यावरण संवर्धन, पारदर्शक भूसंपादन आणि मतदार यादी पुनरीक्षणात चिपळूण उपविभागीय कार्यालयाने बजावलेली कामगिरी अव्वल दर्जाची असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक प्रशासनाचा गौरव केला. बैठकीत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी २०२१ च्या पुरानंतर केलेली ठोस उपाययोजना, अचूक संदेशवहन यंत्रणा, नद्यांचे गाळ उपसा अभियान, प्लास्टिकमुक्ती आणि ‘एका क्लिकवर भूसंपादन मोबदला’ या पारदर्शक उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी कळंबस्ते येथील निसर्गसंपन्न देवराईला भेट देऊन जैवविविधतेचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्या’ची पाहणी करून शेतकऱ्यांच्या दळणवळण सुविधेचा आढावा घेतला. कोंडमळा ग्रामपंचायतीत ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील घरकुलांची थेट पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधला. शेवटी चिपळूण नगरपरिषदेला भेट देऊन त्यांनी लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा केली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि अर्चना बोंबे उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 03-09-2026