३० सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्याची संधी
रत्नागिरी: केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदार यादी निरीक्षक तथा कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. खेड येथील तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदार यादी पुनरीक्षण मोहीम आणि आगामी गणेशोत्सवाच्या प्रशासकीय पूर्वतयारीची माहिती दिली.
रत्नागिरी जिल्ह्याने १०० टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला असून या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रुबल अगरवाल यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. प्रशासनाकडून मतदार याद्यांचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले असून हरकती व सूचना नोंदवण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात गैरहजर, स्थलांतरित किंवा मयत (ASD) मतदारांचे प्रमाण अवघे ९.९ टक्के (सुमारे १ लाख ३१ हजार ६१० मतदार) असून त्यांची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे.
नागरिकांनी नावे तपासण्याचे आवाहन सर्व तहसील, उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (CEO Website) अथवा स्थानिक प्रशासकीय कार्यालयात आपले नाव तपासावे. नाव नसल्यास किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास ‘फॉर्म ६’ व ‘फॉर्म ८’ भरून त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशभक्तांसाठी प्रशासन सज्ज कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री व वरिष्ठ मंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठका पार पडल्या असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. गणेशभक्तांना प्रवासात व उत्सवादरम्यान कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 03-09-2026














