ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्याकडे जाणाऱ्या ५०० मीटरच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; रस्ता नूतनीकरणाची स्थानिक व दुर्गप्रेमींची मागणी
मंडणगड, रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले बाणकोट (किल्ले हिम्मतगड) कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे किल्ल्याकडे जाणारी वाट अत्यंत बिकट व धोकादायक बनली असून, या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे, अशी तीव्र मागणी पर्यटक व इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.
बाणकोट ते वेळास दरम्यानच्या मुख्य मार्गावरून किल्लेवाडीमार्गे किल्ल्याकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची ही अवस्था झाली आहे. मुख्य मार्गापासून सुमारे ५०० मीटर अंतराच्या या रस्त्यावर ठीकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गात बहुतांश भागात तीव्र चढ आणि अवघड वळणे असल्याने वाहनधारकांना आधीच कसरत करावी लागते, त्यात रस्त्यावरील खड्ड्यांची भर पडल्याने किल्ल्याकडे जाणारा प्रवास अधिकच धोकादायक झाला आहे.
कोकणाच्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार
पूर्ण तटबंदीचे अवशेष असलेला बाणकोट अर्थात किल्ले हिम्मतगड हा कोकणाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सावित्री नदी समुद्राला मिळण्याच्या महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. पूर्वी समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर तसेच परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. विविध राजवटींच्या काळात या परिसराला अनन्यसाधारण महत्त्व लाभले होते.
पर्यटक व इतिहासप्रेमींमध्ये नाराजी
या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी वर्षभर इतिहासप्रेमी, अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांची मोठी वरदळ असते. मात्र, किल्ल्याकडे जाणाऱ्या एकमेव संपर्क रस्त्याची दुरवस्था झाल्याने पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ५०० मीटर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून नूतनीकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 03-09-2026














