चाकरमान्यांच्या मागणीची दखल घेत ‘मोदी एक्स्प्रेस’च्या वेळेत मंत्री नितेश राणे यांच्याकडून मोठा बदल
कणकवली: Modi Express Train च्या प्रवासाबाबत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाचा मान राखत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी जाहीर केलेल्या तारखांऐवजी आता ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दरवर्षी ही विशेष रेल्वे सोडण्यात येते. यापूर्वी ही ट्रेन ९ आणि ११ सप्टेंबर रोजी सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी असंख्य चाकरमान्यांनी केली होती. चाकरमानी आणि कोकणवासीयांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री नितेश राणे यांनी ११ व १३ सप्टेंबर रोजी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.
गणेशभक्तांनी नाचत-गात, भजनांच्या गजरात आणि उत्साहात आपल्या गावी कोकणात पोहोचावे, या उद्देशाने ‘मोदी एक्स्प्रेस’ची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही दिवशी सकाळी १०.३० वाजता दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १४ वरून ही ट्रेन सुटणार आहे.
या विशेष प्रवासाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक चाकरमान्यांनी भाजपच्या संबंधित मंडळ अध्यक्षांशी तात्काळ संपर्क साधून आपल्या तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 03-09-2026














