मटका जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त; चिपळूण व शिरगाव पोलिसांची विविध ठिकाणी धडक कारवाई
चिपळूण, रत्नागिरी: चिपळूण शहर व परिसरातील जुगार अड्ड्यांविरोधात चिपळूण आणि शिरगाव पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. शहरातील शिवनदीकिनार, खेर्डी बाजारपेठ आणि पोफळी येथील एमएससीबी कॉलनी जवळ धाड टाकून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
१ सप्टेंबर रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण शहरातील शिवनदीनजीक पोलिसांनी कारवाई केली. यात केशव धोंडू टेरवकर (६६, रा. मुरादपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मटका जुगाराचे साहित्य स्वीकारून जुगार खेळताना त्यांना १,२७२ रुपये रोख व पावती पुस्तकासह रंगेहात पकडण्यात आले.
पोफळी व खेर्डीतही पोलिसांचा छापा
पोफळी येथील एमएससीबी कॉलनीमधील एका पडक्या इमारतीत जुगार अड्डा चालवणाऱ्या रमेश यशवंत खराडे (६०, रा. पोफळी मार्केट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्याकडून ६२५ रुपयांची रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
तर १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खेर्डी बाजारपेठेतील मिरगल चाळ येथे छापा टाकून सुनील बाळ दाते (५८, रा. दातेवाडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली. जुगार खेळताना व खेळविताना पकडलेल्या या व्यक्तीकडून २,५५२ रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 03-09-2026














