Rakshabandhan MSRTC Revenue: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींकडून एसटीला ४० लाखांची ओवाळणी!

गतवर्षापेक्षा तब्बल ३५ लाखांनी उत्पन्न अधिक; रत्नागिरी विभागातून ११७ जादा एसटी बसेस धावल्या

रत्नागिरी: रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीने ११७ जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. २६ ते ३० ऑगस्टदरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत बसेसनी तब्बल ७६ हजार किलोमीटरची वाहतूक केली. यातून रत्नागिरी एसटी विभागाला ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात तब्बल ३५ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

रक्षाबंधनानिमित्त महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. यामुळे होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या नऊ आगारांतून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर या विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या सुविधेचा हजारो प्रवाशांनी लाभ घेतला.

उत्पनात विक्रमी वाढ
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के तिकीट सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत लागू असतानाही एसटी विभागाला भरघोस उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी रक्षाबंधनाला ५९ बसेस धावल्या होत्या, ज्यातून एसटीला ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा ११७ बसेस सोडण्यात आल्याने उत्पन्न थेट ४० लाखांवर पोहोचले आहे.

‘लालपरी’लाच पसंती: विभाग नियंत्रक
“रक्षाबंधनानिमित्त रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे सुयोग्य नियोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींनी लालपरीलाच पसंती दिली. तब्बल ७६ हजार किलोमीटरपर्यंत एसटी धावली असून विभागाला ४० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे,” अशी माहिती रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 03-09-2026