Protest Against Contractual Recruitment: कंत्राटी पद्धतीविरोधात खेडमध्ये युवकांचा एल्गार; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक; २ ऑक्टोबरला साखळी उपोषणाचा इशारा

खेड, रत्नागिरी: महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी आणि शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीच्या वाढत्या वापरा विरोधात ‘युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ’ आक्रमक झाला आहे. कायम स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेण्याची पद्धत थांबवून शासकीय रिक्त पदांची नियमित व पारदर्शक भरती करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने बुधवारी खेडचे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) यांना देण्यात आले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी तालुक्याध्यक्ष मिलिंद जाधव, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण हवालदिल झाले आहेत. रिक्त पदे असताना नियमित भरती का केली जात नाही आणि कायमस्वरूपी कामे कंत्राटी पद्धतीने का करून घेतली जातात, असा संतप्त सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
शासकीय व निमशासकीय विभागांतील कंत्राटी पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन अनावश्यक कंत्राटी पद्धत बंद करावी आणि रिक्त पदांची पदनिहाय आकडेवारी जाहीर करून नियमित भरती सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी न्याय्य धोरण आखून कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन, किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी मनुष्यबळ पुरवठ्यातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

शासनाने मागण्यांवर निश्चित कालमर्यादेत लेखी निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याचाच भाग म्हणून २ ऑक्टोबर रोजी खेड प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

या प्रसंगी विजय पवार, सुनील जाधव, बाळाराम पवार, वर्षा म्हस्कर, चंदा जाधव, खलील भाई, किरण तायडे, फारूक मणियार, अल्लादिन मोहीमतुले, सुनील पवार, अनिल मोरे, रामचंद्र कदम, वारीस तांबे, अली सहीबोले, अरुण सोंडकर, दत्तात्रय मोरे, वहीद कवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 03-09-2026