स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे यशस्वी; तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात अडकले होते ८ खलाशी
रत्नागिरी : समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘धनलक्ष्मी’ ही मच्छीमार नौका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून भरकटली होती. अखेर स्थानिक मच्छीमार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रविवारी (६ सप्टेंबर) ही नौका आणि त्यावरील ८ खलाशांना सुखरूपपणे रत्नागिरीतील मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात यश आले आहे.
Fishing Boat Rescue आणि मदत मोहिमेचा घटनाक्रम
‘धनलक्ष्मी’ नौका समुद्रात मासेमारी करत असताना अचानक तिच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. संपर्क यंत्रणा कोलमडल्यामुळे आणि बोट सुरू होत नसल्याने ही नौका समुद्राच्या लाटांवर भरकटत रत्नागिरी व पावसाच्या दरम्यानच्या सागरी क्षेत्रात आली होती. नौकेतील खलाशी आणि बोटीच्या मालकांनी सुरुवातीला मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तसेच मच्छीमारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मदतीचा संदेश प्रसारित केला.
सामाजिक कार्यकर्ते आणि मच्छीमारांची रात्रभर धावपळ
व्हॉट्सॲप ग्रुपवरील संदेश पाहताच ‘कोकण संघटक’चे ताहीर मुल्ला यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी नावीद कनवडकर, मतीन डोंगरकर, सुहेल साखरकर, अल्ताफ साखरकर व नुरुल शेठ यांच्या मदतीने रात्रभर शोध व मदत मोहीम राबवली. या मोहिमेत मत्स्य विभागाचे अधिकारी चिन्मय, होमगार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी खलाशांना बोटीचे इंजिन सुरू करण्यात यश आले. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने नौका सुरक्षितपणे मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात आली. जेट्टीवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुंबईहून आलेल्या बोटमालकाची व खलाशांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची व पाण्याची सोय केली.
शासकीय यंत्रणांपेक्षा स्थानिकांची तत्परता मोलाची
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना ‘सागर सम्राट मच्छीमार बचाव व संघर्ष समिती’चे संस्थापक अध्यक्ष जनाबभाई कारभारी म्हणाले, “तीन दिवस नौका समुद्रात भरकटलेली असताना शासकीय यंत्रणांनी अधिक वेगाने मदतीसाठी धावून जाणे गरजेचे होते. मात्र, स्थानिक मच्छीमार आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच या सर्व खलाशांचा जीव वाचू शकला.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 07-09-2026














