शहर, ग्रामीण, जयगड व पूर्णगड पोलिसांची मोठी मोहीम; अवैध पार्किंग करणाऱ्यांवर ‘BNS’ अंतर्गत गुन्हे
रत्नागिरी (विशेष बातमीदार): रत्नागिरी शहर आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी पोलिसांनी विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे. ४ सप्टेंबर रोजी शहर, ग्रामीण, जयगड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघातास आमंत्रण देईल अशा स्थितीत वाहने उभी करणाऱ्या ६ वेगवेगळ्या वाहनचालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Ratnagiri Traffic Crackdown: एमआयडीसी मिरजोळे परिसरात दोन ट्रक चालकांवर कारवाई
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी मिरजोळे येथील कांचन हॉटेल ते रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ट्रक्स उभे केल्याचे आढळून आले. यात कर्नाटकचे दोन ट्रक चालक पोलीस कारवाईच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलीस हवालदार लक्ष्मण कोकरे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक सय्यदबाब मेहबूब मकाशी (वय ३०, रा. कर्नाटक) याच्यावर, तर पोलीस हवालदार रुपेश भिसडे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक गुंडप्पा मल्लप्पा हडगी (वय ४७, रा. कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांची वर्दळीच्या रस्त्यांवर धडक कारवाई
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली:
- हॉटेल कुळस्वामिनी समोर: टेम्पो (MH 08 BC 2209) उभा करून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी चालक रोहित राजेंद्र पाटील (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) याच्यावर पो. हवा. कुशल हातिसकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला.
- आठवडा बाजार ते एसटी स्टँड: रिक्षा (MH 08 K 4388) रस्त्यात उभी केल्याने चालक बालाजी किसन चव्हाण (वय २८, रा. नाचणे) याच्यावर स. पो. फो. संदेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.
- साळवी स्टॉप परिसर: अभिलाष टूर्ससमोर इनोव्हा कार (MH 08 AG 9600) उभी केल्याप्रकरणी इंद्रनिल अजित जुवेकर (रा. अभ्युदेयनगर) याच्यावर, तर मारुती मंदिर सर्कलजवळ टेम्पो ट्रॅव्हलर (MH 08 AP 8840) उभा केल्याप्रकरणी शिवप्रसाद संदीप ठाकूर (वय २४, रा. कारवांचीवाडी) याच्यावर कारवाई करण्यात आली.
जयगड व पूर्णगड सागरी पोलिसांकडूनही गुन्हे नोंद
जयगड ते निवळी रस्त्यावर खंडाळा बस स्टॉपजवळ गाडी (MH 43 CE 1676) रस्त्यात पार्क केल्याप्रकरणी चालक सौरभ मच्छिंद्र भोसले (वय २४, सध्या रा. खंडाळा) याच्यावर पो. शि. निलेश गुरव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावस एसटी स्टँडसमोर मोटरसायकल (MH 08 S 5114) धोकादायक रीतीने उभी केल्याप्रकरणी चालक शादाब रब्बतुल्ला खान (वय ३२, रा. उद्यमनगर) याच्यावर पो. हवा. प्रवीण बेदरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अवैध पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार चालकांवर ही कडक कारवाई यापुढेही निरंतर सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 07-09-2026














