मुख्य व वाडीजोड रस्ते चकाचक; ग्रामपंचायतीच्या उपक्रमात महिलांचाही मोठा पुढाकार
माखजन (विशेष बातमीदार): संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वत्र व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. गणेशोत्सवात गावातील आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव या स्वच्छता मोहिमेद्वारे सज्ज झाले आहे.
Ambaw Ponkshe Cleanliness Drive: रस्ते अन् वाड्या झाल्या चकाचक
गावातील प्रत्येक वाडीतील रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने ग्रामपंचायतीच्या या अभियानात सहभाग घेतला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, वेली यांची छाटणी करण्यात आली, तसेच रस्त्यालगत वाढलेले गवत ग्रास कटरच्या साहाय्याने साफ करण्यात आले. मुख्य रस्ता व वाडीजोड रस्ते स्वच्छ दिसण्यासाठी झाडलोट करण्यात आली असून, रस्त्यावर वाकलेल्या मोठ्या फांद्याही हटवण्यात आल्या. या स्वच्छता अभियानात पुरुषांसोबतच महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांची उपस्थिती
या स्वच्छता मोहीमेमुळे गावातील धूळप, मांडवकर आणि जुवळेवाडीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे स्वच्छ झाले आहेत. या अभियानात गावाचे सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या ग्रामस्वच्छता अभियानामुळे आंबव पोंक्षे गाव आता गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 07-09-2026














