कोकणातील ३ लाखांपेक्षा जास्त घरांची दारे उघडणार; ५०० विशेष गाड्या आणि ५,२२० एसटी बसची सोय
ठाणे : लाखो चाकरमान्यांचे स्नेहाबंध जुळलेला गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या उत्सवासाठी मुंबईसह देशभरातून तब्बल २५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. चाकरमान्यांच्या प्रवासासाठी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळपर्यंत विशेष रेल्वे गाड्या तसेच हजारोंच्या संख्येने अतिरिक्त एसटी साध्या व आरामदायी बस सोडण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Ganeshotsav Konkan Migration: वाहतूक यंत्रणा सज्ज
गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून एकूण ५०० विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. दुसरीकडे एसटी महामंडळाने ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा एसटी बस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याशिवाय खाजगी ट्रॅव्हल्स आणि खाजगी गाड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे गाड्या पूर्णपणे फुल्ल झाल्या असून महामार्गावर गर्दीचा ओघ सुरू झाला आहे.
३ लाखांपेक्षा जास्त बंद घरांची दारे उघडणार
वर्षभर रोजगाराच्या निमित्ताने मुंबई व इतर शहरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांमुळे एरव्ही बंद असलेली कोकणातील तीन लाखांपेक्षा जास्त घरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने उघडली जाणार आहेत. यामुळे वर्षभर शांत असणारी गावे, वस्त्या आणि वाड्या टाळ-मृदंगाच्या गजर, आरती व भजनाच्या सुरांनी गजबजणार आहेत.
चाकरमानी म्हणजे काय?
कोकणातून नोकरी आणि रोजगारासाठी मुंबई किंवा इतर शहरांत स्थायिक झालेल्या तरुण व वयस्क वर्ग या सर्वांसाठी ‘चाकरमानी’ ही संज्ञा पारंपरिक रीतीने वापरली जाते. पूर्वी मनीऑर्डर पाठवणारा आणि कुटुंबाचा मुख्य कर्ता पुरुष म्हणून त्याची ओळख होती. मध्यंतरी या शब्दावर काही हरकती घेतल्या गेल्याने ‘भूमिपुत्र’ असा शब्द प्रयोग सुरू झाला. मात्र, चाकरमानी म्हणवण्यात आम्हाला कोणताही अपमान वाटत नाही, अशी भूमिका नोकरदारांनी घेतल्याने हा वाद शमला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 07-09-2026














