Pachal Dahihandi 2026 Record: पाचलमध्ये १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची ऐतिहासिक दहीहंडी; ३ पथकांनी मिळून रचले ७ थर

दिवटेवाडी, भू आणि खडपेवाडी पथकाची संयुक्त कामगिरी; ७ थर रचून फोडली मानाची हंडी

पाचल : पाचलच्या इतिहासात प्रथमच तळवडे जि. प. गट, पाचल विभाग आणि शिवसेना महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची विक्रमी दहीहंडी बांधण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक रकमेची दहीहंडी ठरलेल्या या उत्सवाचा अभूतपूर्व थरार अनुभवण्यासाठी पाचल बाजारपेठेत गोविंदाप्रेमी नागरिकांची तुफान गर्दी झाली होती.

Pachal Dahihandi 2026: तीन पथकांनी मिळून फोडली ७ थरांची हंडी

सात थरांची ही गगनचुंबी दहीहंडी फोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील नामांकित गोविंदा पथके पाचलमध्ये दाखल झाली होती. ढोल-ताशांचा दणदणाट आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण पाचल परिसर दुमदुमून गेला होता. अखेर ‘हनुमान प्रसन्न दिवटेवाडी’, ‘कालिका माता भू’ आणि ‘न्यू हनुमान खडपेवाडी-मराजापूर’ या तीन गोविंदा पथकांनी संयुक्तपणे ७ थरांची भक्कम रचना करत ही मानाची दहीहंडी फोडण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

आमदार किरण सामंत आणि अपूर्वा सामंत यांच्याकडून कौतुक

या विक्रमी दहीहंडी उत्सवाला आमदार किरण सामंत आणि शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी विशेष भेट देऊन गोविंदा पथकांचे तसेच आयोजकांचे कौतुक केले.

यावेळी विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, आत्माराम सुतार, अमित साळवी, सिद्धार्थ जाधव, जि. प. सदस्या सिद्धाली मोरे, पं. स. सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफिलकर, सरपंच गायत्री साळवी, सुनील गुरव, संतोष सावंत, उदय राणे, रवींद्र सावंत, विहंग खानविलकर, हर्षद तेलंग, सिद्धेश नारकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळे हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 07-09-2026