गेल्या दोन महिन्यांत २९ गुरे पकडली; दंड न भरल्याने २६ गुरांची चिपळूणच्या गोशाळेत रवानगी
राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या गुरांविरोधात राजापूर नगर पालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत पालिकेच्या पथकाने शहराच्या विविध भागांतून तब्बल १३ मोकाट गुरे पकडली असून, या धडक मोहिमेमुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांना बसणार आळा
राजापूर शहरासह लगतच्या गावांमधील जनावरे शहराच्या वर्दळीच्या रस्त्यांवर उघड्यावर सोडली जात असल्याने अनेक वर्षांपासून मोकाट गुरांचा वावर वाढला होता. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती, तर अनेकदा अपघातांचे प्रसंगही घडत होते. या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असल्याने पालिकेने बैठकीत ठोस निर्णय घेऊन ही मोहीम हाती घेतली आहे.
पकडलेली जनावरे थेट कोंडवाड्यात; प्रतिसाद न दिल्यास गोशाळेत रवानगी
गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेची ही मोहीम सुरू आहे. रस्त्यावरून पकडण्यात आलेली गुरे थेट पालिकेच्या कोंडवाड्यात ठेवली जातात आणि संबंधित मालकांना दंड भरून गुरे सोडवून घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र, मालकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास किंवा जनावरे सोडवून न घेतल्यास ती थेट गोशाळेत पाठवली जात आहेत.
२६ गुरांची चिपळूणच्या गोशाळेत रवानगी
गेल्या दोन महिन्यांच्या मोहिमेत पालिकेने शहरातून एकूण २९ मोकाट गुरे पकडली आहेत. त्यापैकी केवळ ३ गुरे त्यांच्या मालकांनी पालिकेचा दंड भरून सोडवून नेली आहेत. उर्वरित २६ गुरांवर मालकांनी दावा न केल्यामुळे पालिकेने त्यांची रवानगी चिपळूण येथील गोशाळेमध्ये केली आहे. गुरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.













