NMMS Question Bank Launch Ratnagiri: रत्नागिरीतील ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; NMMS संचाचे मोफत वितरण

दरवर्षी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचा विशेष उपक्रम

रामपूर : रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (NMMS) परीक्षा प्रश्नपत्रिका संचाचे प्रकाशन ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे पार पडणार आहे. जिल्ह्यातील या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शाळांना हा प्रश्नपत्रिका संच पूर्णपणे मोफत वितरित केला जाणार आहे.

NMMS Question Bank Launch Ratnagiri: ४ वर्षांत मिळतात तब्बल ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती

महाराष्ट्र शासनाच्या वतीने इयत्ता ८ वी मधील कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी एन. एम. एम. एस. परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे सलग ४ वर्षे एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा आणि जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारकांचा टक्का वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.

शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा

माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्याध्यापक संघाने जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मार्गदर्शक शिक्षकांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करून तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हास्तरीय कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

८ सप्टेंबर रोजी आयोजित या जिल्हास्तरीय कार्यशाळा व प्रश्नपत्रिका संच प्रकाशन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण व वित्त सभापती नंदकुमार मुरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, राज्य महामंडळ कोषाध्यक्ष संदेश राऊत आणि रमेश तरवडेकर यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 07-09-2026