गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाचा निर्णय

गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाचा निर्णय

ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांच्या पाठपुराव्याला यश; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक व होमगार्ड सज्ज

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबर रोजी हा समुद्रकिनारा अचानक बंद करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी दिलेल्या तातडीच्या आदेशानंतर शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ पासून हा बीच पर्यटकांसाठी पूर्ववत खुला करण्यात आला आहे.

ग्रामस्थ व व्यावसायिकांची पालकमंत्र्यांकडे धाव

समुद्रकिनारा बंद झाल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यवसायांवर गदा आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी शुक्रवारी (४ सप्टेंबर) रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक पार पडली.

पर्यटकांच्या सुरक्षेची सक्षम यंत्रणा कार्यरत

या बैठकीत ग्रामस्थांनी प्रशासनासमोर समुद्रकिनाऱ्यावरील प्रत्यक्ष स्थिती मांडली. गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा प्रशिक्षित जीवरक्षक दोन स्वतंत्र सत्रांत बीचवर कार्यरत असून, जयगड पोलीस ठाण्यांतर्गत होमगार्ड्सचीही तैनात करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना समुद्रात उतरताना सातत्याने सुरक्षा सूचना दिल्या जात असल्याची माहिती देण्यात आली.

पालकमंत्र्यांचे तात्काळ आदेश; पर्यटकांना मोठा दिलासा

वस्तुस्थिती आणि सुरक्षेची खात्री पटल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तात्काळ खुला करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शनिवारपासून पर्यटकांना बीचवर प्रवेश देण्यात आला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी उपसरपंच मयूर केदार, माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे, रवी ठावरे, अविनाश माने, उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव यांच्यासह ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकांनी विशेष पाठपुरावा केला.