१ जून ते ७ सप्टेंबर दरम्यान २ हजार ५५४ मि.मी. पाऊस; भात-नाचणी पिकांना मिळाला मोठा दिलासा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या चोवीस तासात एकूण २५०.३९ मि.मी., तर सरासरी २७.८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
Ratnagiri Monsoon Update: भात व नाचणी पिकांना नवसंजीवनी
जिल्ह्यात मान्सून वेळेवर दाखल होऊनही यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. जून महिन्यात अवघे चार ते पाच दिवसच पाऊस झाला. जुलै महिन्यात दमदार पावसाने जून महिन्याचा बॅकलॉक भरून काढला, मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. आता सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात आणि नाचणी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पाणीटंचाई दूर झाली असून नद्या आणि धरणांमधील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.
तालुकानिहाय पावसाची २४ तासांतील आकडेवारी (मि.मी. मध्ये)
गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत झालेला पाऊस खालीलप्रमाणे आहे:
| तालुका | पाऊस (मि.मी. मध्ये) |
| मंडणगड | ८.५० मि.मी. |
| दापोली | २३.७१ मि.मी. |
| खेड | १४.२८ मि.मी. |
| गुहागर | ३४.४० मि.मी. |
| चिपळूण | ३४.७७ मि.मी. |
| संगमेश्वर | ३३.६७ मि.मी. |
| रत्नागिरी | ३२.६६ मि.मी. |
| लांजा | ४७.४० मि.मी. |
| राजापूर | २१.०० मि.मी. |
| एकूण पाऊस | २५०.३९ मि.मी. |
गतवर्षीच्या तुलनेत अजूनही ८३० मि.मी. पाऊस कमी
जिल्ह्यात १ जून ते ७ सप्टेंबरपर्यंत सरासरी २ हजार ५५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार ३६२ मि.मी. पाऊस पडला होता. त्यामानाने यंदा तब्बल ८३० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे उर्वरित सप्टेंबर महिन्यात मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:19 08-09-2026














