भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद
गुहागर : गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून एक मनोरुग्ण व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मनोरुग्ण व्यक्ती वेड्याच्या भरात निघून गेली असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असले, तरी एखाद्या अज्ञात व्यक्तीने गैर उद्देशाने त्यांचे अपहरण केले असल्याच्या संशयावरून गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १४०(३) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Guhagar Missing Mentally Ill Person: २ सप्टेंबरपासून शोध सुरू
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर मधुकर सांगळे (वय ५७, रा. वरचापाट दुर्गादेवीवाडी, गुहागर) यांचे मित्र राजेंद्र बाळकृष्ण रहाटे यांचे बंधू महेंद्र बाळकृष्ण रहाटे (वय ४५, रा. छत्रपती शिवाजी चौक, गुहागर) हे मनोरुग्ण आहेत. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास महेंद्र रहाटे हे कोणालाही काहीही न सांगता राहत्या घरातून अचानक निघून गेले.
नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही सुगावा नाही
महेंद्र रहाटे घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तसेच मित्रांनी आसपासच्या परिसरात, बसस्थानक आणि नातेवाईकांकडे त्यांचा कसून शोध घेतला; मात्र त्यांचा कुठेही सुगावा लागला नाही. महेंद्र रहाटे यांची मानसिक स्थिती पाहता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना गुप्तपणे व गैर मार्गाने पळवून नेल्याची खात्री वाटल्याने अखेर फिर्यादी सुधाकर सांगळे यांनी गुहागर पोलिसांत धाव घेतली.
५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या या फिर्यादीवरून गुहागर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, बेपत्ता महेंद्र रहाटे यांचा सर्वत्र शोध सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:38 08-09-2026














