मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अंतिम श्वास; दापोली पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
दापोली : दापोली तालुक्यातील जाळगाव सुतारवाडी येथील एका ८१ वर्षीय वृद्धाचा घराच्या अंगणात अचानक तोल जाऊन पडल्यामुळे मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Dapoli Senior Citizen Death: झोपेची डुलकी आल्याने गेला तोल
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत भागोजी गणू ठोंबरे (वय ८१, रा. जाळगाव सुतारवाडी, ता. दापोली) हे ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मूळ गावातील घराच्या अंगणातील कटड्यावर बसले होते. त्यावेळी अचानक झोपेची डुलकी आल्याने त्यांचा मागे तोल गेला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या मानेला गंभीर मुक्कामार लागून मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले.
दापोली ते मुंबई नायर रुग्णालय : उपचार सुरू असताना मृत्यू
अपघातानंतर कुटुंबीयांनी त्यांना ९ ऑगस्ट रोजी दापोली येथील सरगुरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मानेचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे सांगत शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना २१ ऑगस्ट रोजी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वॉर्ड क्रमांक २८ मध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून कागदपत्रे प्राप्त
या घटनेची प्राथमिक नोंद मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात (अकस्मात मृत्यू – B.N.S.S. कलम १९४ नुसार) करण्यात आली होती. तेथून कागदपत्रे उशिरा प्राप्त झाल्यामुळे ५ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कागदोपत्री नोंद पूर्ण करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
07:38 08-09-2026














