मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाची जोरदार पुनरागमनाची शक्यता; पंजाबराव डखांचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे खरिपाची पिके करपू लागली असून पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असून १४ ते २२ सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Rain Panjabrao Dakh Prediction: १३ सप्टेंबरपासून सुरुवातीचा पाऊस कुठे?
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबरपासून १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, १३ सप्टेंबरपासून हळूहळू पावसाचे आगमन होईल. सुरुवातीच्या टप्प्यात धुळे, नंदुरबार, नाशिक, जालना आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल.
१४ ते २२ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
१३ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढून १४ ते २२ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, बारामती, फलटण, आटपाडी, पंढरपूर, सांगोला, जत, मंगळवेढा आणि दौंड परिसरात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
कोरडे तलाव अन् बंधारे भरणार; बीड, धाराशिव, लातूरला दिलासा
मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत १६ ते २२ सप्टेंबर या काळात चांगला पाऊस अपेक्षित आहे. या पावसामुळे कोरडे पडलेले छोटे तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढेल. तसेच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:07 08-09-2026














