MPSC Controversy News: ‘एकजरी पुरावा दिला तर एका क्षणात राजीनामा देईन’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची भूमिका

औषध निरीक्षक पेपरफुटीवर विवेक भीमनवार यांचे स्पष्टीकरण; विरोधकांचे अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन

पुणे / मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, अनियमितता आणि कारभारावर उठलेल्या प्रश्नांवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वादाच्या आणि राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी जाहीर निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझ्यावर सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने मी व्यथित झालो आहे. माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही,” असे आव्हानात्मक विधान भीमनवार यांनी केले आहे.

MPSC Controversy News: ‘पेपरफुटीची घटना मी पदभार स्वीकारण्यापूर्वीची’

औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीवर बोलताना अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीचा आहे. “तक्रार प्राप्त होताच आयोगाकडून तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या पोलीस तपास वेगाने सुरू आहे. पेपरफुटीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तसेच राज्य सरकारनेही उच्चाधिकार समिती गठीत केली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी सल्लामसलत सुरू आहे.”

आपल्या कार्यकाळातील कामगिरीचा पाढा वाचताना ते म्हणाले, “माझ्या कार्यकाळात स्पर्धा परीक्षांच्या ८ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ चाळणी परीक्षा अशा एकूण ८४ परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. पूर्वी निकालांना महिना अन् महिने लागायचे, मात्र आता अवघ्या १८ ते २१ दिवसांत निकाल जाहीर केले जात आहेत.”

पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा ‘आक्रोश मोर्चा’; सुप्रिया सुळे, रोहित पवार रस्त्यावर

दुसरीकडे, एमपीएससीच्या भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मार्च २०२६ मध्ये झालेल्या औषध निरीक्षक गट-ब परीक्षेचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम यांनी थेट मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला, तर आदित्य ठाकरे आणि अभिजीत दिपके यांनीही आंदोलनाला समर्थन दिले. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या परीक्षांमध्येच भ्रष्टाचार होत असेल तर प्रश्न विचारायचे नाहीत का? यात कुठले राजकारण आले?”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:12 08-09-2026