पालकमंत्री उदय सामंत यांची अलोरे वसाहतीला अचानक भेट
चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर विस्थापित झालेल्या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर अंतिम टप्प्यात आला आहे। अलोरे येथे उभारण्यात आलेल्या सर्वसोयींनी युक्त पुनर्वसन वसाहतीतील ३३ घरांचे येत्या १२ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। या लोकार्पण सोहळ्यानंतर प्रत्यक्ष घरवाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन धरणग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळणार आहे।
Tivare Dam Disaster Rehabilitation: पालकमंत्र्यांकडून अलोरे वसाहतीची अचानक पाहणी
पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी अचानक अलोरे येथे भेट देऊन पुनर्वसन वसाहतीची पाहणी केली। त्यांनी घरांची गुणवत्ता, उपलब्ध नागरी सुविधा आणि संपूर्ण पुनर्वसन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली।
यावेळी बोलताना ते म्हणाले, “तिवरे धरण फुटल्यानंतर झालेल्या भीषण दुर्घटनेत अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले होते। या धरणग्रस्त ग्रामस्थांचे सुरक्षित आणि योग्य पुनर्वसन करण्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून अलोरे येथे पक्की घरे उभारण्यात आली आहेत। या प्रकल्पासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट आणि सिडकोच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.”
सोडत पद्धतीने होणार घरांचे पारदर्शक वाटप
१९ घरांच्या वाटपाबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ग्रामस्थांनी आपापसात एकमताने निर्णय घ्यावा। जर ग्रामस्थांमध्ये एकमत झाले नाही, तर प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकृत लॉटरी (सोडत) काढून नियमानुसार घरांचे पारदर्शक वाटप केले जाईल।
वाहून गेलेल्या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण
गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान वाहून गेलेल्या पुलाच्या कामाबाबत बोलताना त्यांनी सांगीतले की, या पुलासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे। यामुळे परिसरातील वाहतूक व दळणवळणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल।
या पाहणी दौऱ्यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, कपिल शिर्के, जिल्हा परिषद सदस्या विनया झगडे आणि पंचायत समिती सदस्य विनोद झगडे उपस्थित होते।
‘ऑपरेशन टायगर सांगून होत नाही, ते अचानक होते!’
राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य करताना उदय सामंत म्हणाले, “ऑपरेशन टायगर आधी सांगून किंवा जाहीर करून होत नसते, तर ते अचानक घडते। गुवाहाटी, सहा खासदार आणि तीन आमदारांच्या बाबतीत जसे घडले, तसेच पुढील राजकीय घडामोडीही अचानक होतील,” असे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:31 08-09-2026














