“बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष नव्हते, मर्यादित पुरुष होते”; सदावर्तेंच्या वक्तव्याने नवीन राजकीय वाद पेटण्याची शक्यता
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असताना राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार आणि वादग्रस्त निशाणा साधला आहे. “जरांगे हे बिनबुडाचे गाडगे आहे आणि शरद पवार हेच त्यांचे बोलवते धनी आहेत,” अशी खरमरीत टीका सदावर्ते यांनी केली आहे.
Gunratna Sadavarte Statements: ‘मनोज जरांगे मुंबईत येतच नाहीत’
पत्रकारांशी बोलताना सदावर्ते म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या माध्यमातून संविधानाला रसातळाला नेण्याचे काम करू नका. विखे पाटील आता संविधानानुसार बोलत आहेत. जरांगेंचे उपोषण कितीही रंगीत आणि कलरेबल होऊ द्या. मी खात्रीने सांगतो, मनोज जरांगे मुंबईत येतच नाहीत. जरांगेंचे धागेडोरे शरद पवारांकडेच आहेत.”
राज ठाकरेंना एमपीएससीचे काय कळते?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरही सदावर्तेंनी टोला लगावला. “राज ठाकरेंना एमपीएससीचे काय माहिती आहे? त्यांना ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह मधील फरक तरी कळतो का? त्यांना सिलॅब्स माहिती आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना सदावर्ते म्हणाले, “कुलाबा येथे बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे, त्यासाठी रीतसर परवानगी घेतली होती का? आमची कमिटी याची कायदेशीर बाजू तपासून पाहत आहे. बाळासाहेब ठाकरे काय राजे होते का? ते राष्ट्रपुरुष नव्हते, तर मर्यादित पुरुष होते.”
पुढे बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले, “शिवसेना भवनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या वर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कसा? संजय राऊत यांच्यात तो फोटो काढण्याची हिंमत आहे का? शिवाजी पार्कच्या रिक्रिएशन ग्राउंडवर बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीला परवानगी नव्हती, त्यासाठी मी स्वतः याचिका दाखल केली होती,” असेही सदावर्ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:26 08-09-2026














