Sant Namdev Maharaj Sanjivan Samadhi Sohala Devrukh: श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा देवरुखात उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवरूख (प्रतिनिधी): श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज देवरूख यांच्या वतीने आयोजित श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. देवरूख येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरात या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Sant Namdev Maharaj Sanjivan Samadhi Sohala Devrukh: पालखी मिरवणूक अन् महिलांचे गुणदर्शन

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. मंडळाचे खजिनदार दिलीप विंचू यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल-नामाच्या जयघोषात श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान समाज बांधवांनी भजने सादर केली, तर दुपारी महिलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गुणवंतांचा सत्कार व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव

रत्नागिरी जिल्हा शिंपी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी देवरूखचे श्री. दत्तात्रय उर्फ बंड्या मारुती भस्मे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल, तसेच देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल श्री. सिद्धेश संजय वेल्हाळ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेल्या व्यक्तींचा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत मुला-मुलींचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

घरोघरी संत नामदेव महाराजांची प्रतिमा ठेवण्याचा संकल्प

कार्यक्रमात सौ. तृप्ती अशोक कुमठेकर यांनी श्री संत नामदेव महाराज यांच्या जीवन प्रवासावर अत्यंत सुंदर व मार्गदर्शक भाषण केले. तसेच मंडळाचे सभासद श्री. योगेश अरविंद वेल्हाळ यांनी समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी श्री संत नामदेव महाराजांची प्रतिमा असावी ही संकल्पना मांडून उपस्थितांना प्रतिमांचे वितरण केले.

महाआरतीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्याला संगमेश्वर तालुक्यातील शिंपी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन पाडळकर, साहिल वेल्हाळ, दिलीप विंचू व माजी अध्यक्ष संजय वेल्हाळ यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार दिलीप विंचू यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:12 08-09-2026