साडवलीतील गोठ्यात डांबलेल्या १५ गायी-बैलांची सुटका; गोरक्षक आक्रमक, कठोर कारवाईची मागणी
देवरूख : देवरूख नजीकच्या साडवली येथे अवैध आणि विनापरवाना गुरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. एका वाहनातून गुरांची अत्यंत क्रूरपणे वाहतूक होत असताना संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच, लगतच्या एका गोठ्यात तब्बल १५ गायी आणि बैल डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणी देवरूख पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
Devrukh Illegal Cattle Transport: वाहनात २ अन् गोठ्यात १५ गुरे कोंबलेली आढळली
मिळालेल्या माहितीनुसार, साडवली येथील एका संशयित ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनात अत्यंत अमानुषपणे दोन गुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळली. याबाबत गोरक्षकांनी अधिक पाहणी केली असता, जवळच असलेल्या एका गोठ्यामध्ये तब्बल १५ गायी व बैल डांबून ठेवल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सर्व गुरांचा रीतसर पंचनामा केला.
स्थानिक संशयितावर यापूर्वीही गो-तस्करीचे गुन्हे
पोलीस तपासात या बेकायदेशीर प्रकरणात साडवलीतीलच एका स्थानिक व्यक्तीचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या मुख्य संशयितावर यापूर्वीही गो-तस्करी आणि बेकायदेशीर गोवंश वाहतुकीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
गोरक्षक अन् लोकप्रतिनिधी आक्रमक; पोलीस ठाण्यात धाव
ही घटना उघडकीस येताच गोरक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने देवरूख पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, गणेश गायकवाड, सुशील कदम, उमेश कुलकर्णी, श्रीधन बबाळकुंद्रे, सागर नलावडे, मनीष दळवी यांच्यासह अनेक गोरक्षक व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, या गुरांची वाहतूक नेमकी कोणत्या उद्देशाने केली जात होती, यात कोणती मोठी टोळी कार्यरत आहे का, तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे, या सर्व अंगांनी देवरूख पोलीस सखोल तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:48 08-09-2026














