Devrukh Gaur Attack Youth Death: गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी; डेरवण रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

तीन दिवसांच्या उपचारानंतर प्राणज्योत मालवली; सह्याद्रीनगरवर शोककळा

देवरूख : देवरूख – रत्नागिरी मार्गावरील आंबव गावाच्या हद्दीत गवारेड्याने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल जयराम पेडामकर (वय ३८, रा. साडवली सह्याद्रीनगर) या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज दुर्दैवाने अपयशी ठरली आहे. तीन दिवस रुग्णालयात उपचारादरम्यान संघर्ष केल्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Devrukh Gaur Attack Youth Death: तीन दिवसांपासून सुरू होती उपचार मोहीम

शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आंबव परिसरात गवारेड्याने स्वप्निल यांच्यावर अचानक हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने प्रथम रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उच्च उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सह्याद्री नगर मित्र मंडळाकडून दहीहंडी उत्सव रद्द

दहीहंडी उत्सवाच्या तोंडावरच घडलेल्या या भयंकर दुर्घटनेमुळे संपूर्ण साडवली व देवरूख परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कठीण प्रसंगात सह्याद्री नगर मित्र मंडळाने सामाजिक भान जपून आपला नियोजित भव्य दहीहंडी उत्सव रद्द केला होता. एवढेच नव्हे तर उत्सवासाठी जमा झालेला संपूर्ण निधी स्वप्निल यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सुपूर्द केला होता. मात्र, हा उमदा तरुण काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.

मयत स्वप्निल यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:06 08-09-2026