दगड, काठी, लादी आणि कटर ब्लेडचा वापर; चौघे जखमी, ग्रामीण पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे येथील कदमवाडी परिसरात मांजर हरवल्याच्या अतिशय क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला शिवीगाळीपासून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान थेट कटर ब्लेड, दगड, काठी आणि लादीने एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात झाले. या हिंसक घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले असून, परस्पर विरोधी तक्रारींवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल १४ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Ratnagiri Are Assault Case: मांजराच्या वादातून चव्हाट्यावर हाणामारी
प्रसाद प्रकाश कदम (वय ३७, रा. कदमवाडी, आरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या पत्नी पूर्वा यांच्याशी घराबाहेर मांजर हरवल्याबाबत चर्चा करत होते. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या दीपाली कदम यांनी हे बोलणे ऐकून “तुमचे मांजर आम्ही मारले का?” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूचे इतर सदस्यही बाहेर आले आणि शब्दाला शब्द वाढत जाऊन वाद पेटला.
वाद वाढत गेल्याने कदम कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले असता, कदमवाडी चव्हाट्याजवळ मयुरेश आरेकर आणि त्याचे कामगार पाखाडीची साफसफाई करत होते. चालताना कामगाराचा धक्का पूर्वा कदम यांना लागल्याने पंकज कदम यांनी विचारणा केली. यावरून पुन्हा वाद उफाळून आला. या वेळी मयुरेश आरेकर याने प्रसाद कदम यांना कटर ब्लेडने मारहाण केल्याचा आरोप आहे.
दगड, काठ्या अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण; चौघे जखमी
त्यानंतर पाखाडीवर जमाव जमवून कदम कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. प्रसाद कदम यांच्या कपाळावर दगड मारण्यात आला, तर पूर्वा कदम यांच्या ढोपरावर काठीने प्रहार करण्यात आला. पुढे कालभैरव मंदिराजवळ वाहनाकडे जात असताना पंकज कदम, प्रसाद आणि पूर्वा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रसाद प्रकाश कदम, पूर्वा प्रसाद कदम, पंकज प्रकाश कदम आणि प्रतीक्षा प्रकाश कदम हे चौघे जखमी झाले आहेत.
भांडण सोडवायला गेलेल्या महिलेवरही हल्ला
दरम्यान, याच घटनेप्रकरणी अस्मिता आनंद पेडणेकर (वय ५०, रा. आरे मयेकरवाडी) यांनीही पोलिसांत दुसरी फिर्याद दिली आहे. कालभैरव मंदिराजवळ सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, प्रसाद व पंकज कदम यांनी आपल्याला शिवीगाळ करून छातीवर, हातावर व डोक्यावर मारहाण केली, तसेच दुर्वांक कदम याने काठीने मारहाण करून रक्षंदा कदम यांनी धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत करणे, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:58 08-09-2026














