Khed Bus Stand BJP Agitation: विद्यार्थ्यांच्या गैरसोयीविरोधात खेड बस स्थानकावर भाजपचे धडक आंदोलन

नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल; आगार व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

खेड बस स्थानक भाजप आंदोलन खेड (जि. रत्नागिरी) येथे एसटी आगारातील नियोजनशून्य कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने छेडण्यात आले. खेड एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे शाळा-महाविद्यालीन विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गैरसोयीच्या निषेधार्थ भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेड एसटी बस स्थानकावर धडक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी, पालक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याशिवाय अधिकृत बसथांब्यांवर बसेस न थांबवणे, रात्रवस्तीच्या गाड्या वेळेत न सोडणे आणि काही कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी अरेरावी केली जाणे अशा विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत होता. या सर्व प्रश्नांवरून आंदोलकांनी बस स्थानक परिसरात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आगार व्यवस्थापनाचे लेखी आश्वासन

Shree clinic

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन खेड आगार व्यवस्थापनाने तातडीने मध्यस्थी केली. आगार प्रशासनाने भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नावे लेखी पत्र देऊन विविध मागण्यांबाबत सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यामध्ये खालील प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या:

  • शाळा-महाविद्यालीन फेऱ्या वेळापत्रकानुसार सोडणे.
  • ग्रामीण भागातील अधिकृत थांब्यांवर बसेस थांबवून विद्यार्थ्यांना बसमध्ये घेणे.
  • बस न थांबवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करणे.
  • रात्रवस्तीच्या गाड्या वेळेत सोडणे.
  • स्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखणे.

प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची ग्वाही

प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यासोबतच वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. आगार व्यवस्थापनाकडून सर्व मागण्यांबाबत लेखी पत्र मिळाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या आंदोलनाप्रसंगी भाजप खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजप युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, भाजप अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीमभाई सहिबोल, माजी नगरसेविका तथा भाजप महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, प्रीती चिखले, मनोज गायकवाड, राहुल पाटणे, विशाल होळकर, अविराज मोरे, स्वराज गांधी, शुभम गायकवाड, विजय गुप्ता, माजी नगरसेवक संदेश भुवड, अनिकेत पवार, सर्वेश पवार, औवेस चौगुले, अक्षय सनगरे, मिलिंद शिंदे, प्रदीप भोसले, सुयश खेडेकर यांच्यासह अनेक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:35 09-09-2026