Gogate Jogalekar College Ratnagiri Botany Department: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची सोमेश्वरच्या कातळ सड्याला क्षेत्रभेट; वनस्पतींचा अभ्यास

पावसाळ्यात बहरणाऱ्या कंदवर्गीय, औषधी आणि कीटकभक्षी वनस्पतींचे विद्यार्थ्यांनी केले प्रत्यक्ष निरीक्षण

रत्नागिरी:

येथील गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमेश्वर येथील कातळ सड्याला भेट देऊन कोकणातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ‘सडा’ (लॅट्राइट) परिसंस्थेचा सखोल अभ्यास केला.

विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक परिसंस्थांविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून निसर्गाचा अभ्यास करावा, या उद्देशाने महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत अशा विविध शैक्षणिक व पर्यावरणविषयक क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सोमेश्वर येथील सडा परिसंस्थेची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीदरम्यान पावसाळ्यात बहरणाऱ्या सड्यावरील विविध हंगामी, कंदवर्गीय, औषधी तसेच कीटकभक्षी वनस्पतींचे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सुकतेने प्रत्यक्ष निरीक्षण केले.

विविध वैशिष्ट्यपूर्ण व औषधी वनस्पतींची नोंद

या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गुंडण, फोडशी, सीतेची आसवे, मुरडानिया, गवती दवबिंदू, रानहळद, सोनकी आणि मोर खरचुडी यांसारख्या सड्यावर आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची नोंद केली. याचबरोबर कंदीलपुष्पांच्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक फुलोऱ्याने विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. याशिवाय शंखपुष्पी, गुंज, शतावरी आणि काळी मुसळी यांसारख्या महत्त्वपूर्ण औषधी वनस्पतींचेही विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण केले.

प्राध्यापकांचे मार्गदर्शन व यशस्वी नियोजन

या प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. शरद आपटे यांनी विद्यार्थ्यांना सड्यावर आढळणाऱ्या विविध हंगामी वनस्पतींची माहिती दिली. त्यांनी लॅट्राइट (सडा) परिसंस्थेची वैशिष्ट्ये, तेथील हंगामी वनस्पतींची होणारी वाढ, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वनस्पतींमध्ये निर्माण होणारे अनुकूलन (Adaptation) तसेच या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासाचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन क्षेत्राधारित अध्ययनाचा (Field Learning) आनंद लुटला.

या अभ्यासपूर्ण क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा. परेश गुरव यांनी केले होते, तर या उपक्रमात डॉ. विराज चाबके सहभागी झाले होते. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने ही क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पार पडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 11-09-2026