Shree Dev Ganpatipule Sansthan: गणपतीपुळे मंदिरात उद्यापासून भाद्रपदी गणेशोत्सव: विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

१२ ते १५ सप्टेंबर दरम्यान भक्तिमय वातावरणात पार पडणार विविध कार्यक्रम; २३ सप्टेंबरला महाप्रसादाचे आयोजन

गणपतीपुळे:

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील प्रसिद्ध संस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपदी गणेशोत्सव (शके १९४८) अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवानिमित्त १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीने दिलेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या पहिल्या दिवशी, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत श्रींची महापूजा व प्रसाद वितरण पार पडणार आहे. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी दुपारी ११ ते १२ या वेळेत श्रींना सहस्र मोदक अर्पण केले जातील. तसेच १२ ते १५ सप्टेंबर या संपूर्ण उत्सव कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत समुदायिक आरती व मंत्रपुष्पांजलीचा कार्यक्रम पार पडेल.

पालखी प्रदक्षिणा आणि कीर्तन सेवा

उत्सवा दरम्यान दररोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत बीड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी (पटवारी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गणेशोत्सवातील मुख्य आकर्षणांपैकी एक असलेली श्रींच्या पालखीची प्रदक्षिणा व मिरवणूक १४ सप्टेंबर (भाद्रपद शु. ४) रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत काढण्यात येणार आहे.

२३ सप्टेंबरला महाप्रसाद

उत्सवाची सांगता झाल्यानंतर २३ सप्टेंबर रोजी (वामन जयंतीनिमित्त) दुपारी ११.३० ते २ या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटीचे सरपंच निलेश कोल्हटकर आणि सचिव प्रा. विनायक राऊत यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 11-09-2026